कलायडोस्कोप
आज आकाश पुन्हा फाटलंय
पाऊस कधीचा कोसळतोच आहे
हातात चहाचा कप घेउन गॅलरीत उभा मी
आणि मागे रेडिओवर
"ए जिंदगी, गले लगा ले"
चहाच्या वाफा
आणि डोळ्यांवर ओढून घेतलेल्या चष्म्यापुढे
धुकंच धुकं
आणि ह्या धुक्यात एका प्रवाहात येणारे
असंबद्ध विचार
मल्टिप्लेक्स्...
बोन्सायची झाडं...
आणि त्यांचीही एक स्वतःची मायनॉरिटी
पाऊस अजूनही कोसळतोच आहे
धारावी ते मलबार हीलचा
एक विषण्ण प्रवास
असहाय झुणका-भाकर केंद्रांच्या कोलाहलात
एखादा 'मॅकडोनालडस्'
आपल्याच विश्वात रमलेला
गुळगुळीत पानांवरचे विमेन इमॅंसिपेशनचे लेख
आणि अनुभवी फोरास रोड
कशाचाही कशाशीही संबंध नाही
खरंतर सारेच संबंध कधीचेच तुटलेले
आत्ममग्न भिंतींवर बसून
प्रसन्न हसणारे मनु, महमुद आणि एखादा हिटलर
आणि तिथेच एखाद्या कोपरयात
कोण्या महात्म्याचा रक्ताळलेला क्रुस
"ए जिंदगी, गले लगा ले"
रस्त्यावर बागडणारं खळखळतं हास्य
आणि कुण्या साहेबांच्या झिंदाबादचे टिपेला जाणारे आवाज
नळावर आजही पाणी नाही
आणि होऊ घातलाय समोरच्या टॉवरचा
सत्तावीसावा स्लॅब...
कळत जातं असंच कधी कधी जळत जाताना
या सगळ्या प्रश्नांना काहीही किंमत नाही
किमान,
मंत्रालयाच्या सात-बाराचा तिढा सुटल्याशिवाय……
आज पुन्हा आकाश फाटलय
पाऊस कधीचा कोसळतोच आहे
हातात चहाचा कप घेउन वाफाळता मी
एव्हाना माझा कलायडोस्कोप झालेला
०९ मे २०१२
Comments
Post a Comment